मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

रक्तातील, नात्यातील… ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार : देवेंद्र फडणवीस



मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा उपसमितीने काढलेल्या तोडग्यानुसार, ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी सापडतील, त्यांना आणि त्यांच्या रक्तातील तसेच नात्यातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे यांनी केलेल्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या, ज्यामध्ये ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याची प्रमुख मागणी स्वीकारण्यात आली. हा निर्णय मराठवाड्यातील मराठा समाजासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हैदराबाद गॅझेट लागू होणार
फडणवीस म्हणाले, “हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आमची तयारी होती, पण मनोज जरांगे यांची मागणी सरसकट होती, जी कायदेशीरदृष्ट्या शक्य नव्हती. कायद्यानुसार, आरक्षण व्यक्तीला दिलं जातं, संपूर्ण समूहाला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना ही अडचण समजावून सांगितली. जरांगे यांनी हे मान्य केल्यानंतर उपसमितीने तातडीने चर्चा करून हा जीआर (GR) तयार केला.”
या निर्णयामुळे, मराठवाड्यात ज्यांच्याकडे कुणबी नोंदींचा पुरावा असेल, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच, रक्ताच्या नात्यातील आणि लग्नाच्या नात्यातील सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची शंका दूर केली. “ज्यांच्याकडे पुरावा नाही, त्यांना याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यात जुन्या नोंदी मिळण्यास अडचणी होत्या, त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय योग्य आहे आणि तो न्यायालयातही टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मला कितीही शिव्या मिळाल्या तरी मी विचलित झालो नाही. समाजाला न्याय देणं हेच माझं ध्येय आहे. कोणताही निर्णय घेताना समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं माझं कर्तव्य आहे.” मराठा असो वा ओबीसी, महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी काम करत राहणार, असंही त्यांनी सांगितलं.

error: Content is protected !!