गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी शाळेत टिकतील –
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान
बीड दि.17 (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक आणि संबंधित घटकांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले तर विद्यार्थी शाळेत टिकतील. इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसाहित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासून घ्यावे. जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार होणार नाही, यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले.
शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन जिरेवाडी’ या उपक्रमाच्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकारी फुलारी यांनी उपक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि तज्ञ सदस्यांच्या आयोजित बैठकीत गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान बोलत होते. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य इब्राहिम नदाब, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) समिती प्रियाराणी पाटील, उपशिक्षणाधिकारी मैना बोराडे, भगवान सोनवणे आदीसह गटशिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान म्हणाले, इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसाहित शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे. ज्या ठिकाणी अनियमितता असेल तेथील मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सेवाभावी संघटना आणि शिक्षक प्रेमींना सहभागी करून घ्यावे. 100% गुणवत्ता वाढीसाठी वाचन लेखन सुधारण्यासाठी गणित पेटी विज्ञान पेटी अशा पेटी यासह विविध साहित्याचा वापर विद्यार्थ्याने करावा यासाठी प्रयत्न करण्यात यावीत नकाशा वाचन सह भौगोलिक साहित्याचे वाचन करून घेण्यात यावे जिल्हा परिषदेतील शाळेची गुणवत्ता वाढावी आणि टिकावी यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात. कोठेही तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल.
*शिक्षकांच्या उदासीनेतेमुळे विद्यार्थ्यांची गळती*
बीड काही उदासीन शिक्षकामुळे आणि कामचुकारपणामुळे गळतीचे प्रमाण वाढले जाते. यासंदर्भात सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी दैनंदिन अध्यापनात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज, यावेळी सीईओ रहमान यांनी व्यक्त केली.