बीडमधील युवकांना तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी: CIIIT प्रकल्पाला गती
बीड, महाराष्ट्र: बीड जिल्ह्यातील युवकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या CIIIT (Centre of Industry 4.0 Industrial Training) प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे MIDC च्या संचालक मंडळाने बीड औद्योगिक वसाहतीत फेज-3 मध्ये 4,000 चौ. मीटर जागा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा टेक्नॉलॉजीझच्या माध्यमातून 191 कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात येणार आहे. यापैकी 15% म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपये बीड जिल्हा प्रशासन उचलेल, तर उर्वरित निधी टाटा टेक्नॉलॉजी आणि तिच्या भागीदार संस्था उचलणार आहेत. या केंद्रात दरवर्षी सुमारे 7,000 युवकांना आधुनिक तांत्रिक आणि औद्योगिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
बीडच्या प्रशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार
सध्या भारतात उद्योग 4.0 म्हणजेच डिजिटल, ऑटोमेशन, AI आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर आधारित उत्पादन आणि सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. अशा काळात स्थानिक युवकांना या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आणि उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी या प्रकारचं सेंटर अत्यंत आवश्यक मानलं जातं. CIIIT मध्ये CNC मशीन ऑपरेशन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऑटोमेशन, IoT, डेटा अॅनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स यांसारख्या अद्ययावत कोर्सेसद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षित युवकांना स्थानिक व राष्ट्रीय उद्योगांमध्ये थेट नोकरीच्या संधी मिळतील. तसेच, काही कोर्सेस नंतर युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचीही क्षमता प्राप्त होईल.
बीडमध्ये राबवला जाणारा हा प्रकल्प ही केवळ रोजगार निर्मिती नव्हे, तर जिल्ह्याच्या औद्योगिक भवितव्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे. बीडमधील युवकांचे भविष्यासाठी CIIIT हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. बीडच्या औद्योगिकीकरणासाठी आणि कौशल्यविकासासाठी हा टप्पा ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याच्या प्रतिक्रीया विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे.