बीड, दि. २९ – बीडमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक छळ प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन SIT चौकशीची मागणी केल्यानंतर, सरकारने तपास SIT कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.
मात्र या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्य अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी “इतकी मित्रता? मुंडेंनी मागितले आणि दुसऱ्याच दिवशी SIT जाहीर?” असा सवाल उपस्थित केला.
दमानिया यांनी विधानभवनात आज दुपारी २ वाजता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले. त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला की, “जो व्यक्ती स्वतः महिलांवर अत्याचाराचे आरोप झेलतो आहे, त्याच्या मागणीनंतर लगेच महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT जाहीर केली जाते? हा न्याय आहे का?”
त्यांनी यापूर्वी वैष्णवी प्रकरणाचा संदर्भ देत सांगितले की, त्या वेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही फास्ट ट्रॅकवर कारवाईस एक महिना लागला, आणि आता एका दिवसात निर्णय घेतला जातोय.
“बीडच्या पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढणारे सुसंस्कृत आणि निर्भय लोक उपस्थित आहेत. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे.