पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरु केला इलेक्ट्रिक कारचा वापर

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वीकारली ईव्ही कार; रामटेक निवासस्थानापासून विधिमंडळापर्यंत केला प्रवास


मुंबई: प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, आजपासून राज्याच्या पर्यावरण मंत्री **पंकजा मुंडे** यांनी इलेक्ट्रिक कारचा (EV) वापर सुरू केला आहे. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीचे पालन करत, त्यांनी स्वतःच्या रामटेक निवासस्थानापासून विधिमंडळापर्यंतचा प्रवास आज इलेक्ट्रिक कारमधून केला. याद्वारे त्यांनी नागरिकांना प्रदूषण कमी करण्यासाठी ईव्ही वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी अधिवेशनासाठी निघण्यापूर्वी आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचे विधीवत पूजन केले. यावेळी महिंद्रा कंपनीकडून त्यांना या कारची चावी सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री मुंडे यांनी सांगितले की, “प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी ईव्ही वाहनांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास फार मोठी मदत होईल आणि आपल्या राज्याचे पर्यावरण अधिक स्वच्छ आणि निरोगी राहील.”

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, मंत्री मुंडे यांनी स्वतःहून ईव्ही कारचा वापर सुरू केल्याने नागरिकांनाही प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!