आयपीएल 2025 च्या विजेतेपदाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा जल्लोष दुर्दैवाने एका भीषण घटनेमुळे बाधित झाला. बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून, १० हून अधिक चाहते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील RCB ने १८ वर्षांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यामुळे चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर जमा झाले होते. पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ६ धावांनी हरवून RCB ने १८ व्या हंगामाचे विजेतेपद जिंकले होते.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान विजयी जल्लोष साजरा करण्याचा कार्यक्रम ठरला होता, मात्र चाहत्यांच्या अफाट गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गेट क्रमांक ३ जवळ ही चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना शिवाजीनगर येथील बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या घटनेमुळे स्टेडियमजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संघाचे खेळाडू मैदानात दाखल होण्यापूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विधानसौदमध्ये संघाचा सत्कार केला होता.