बीडमध्ये दिया मिल्क प्रॉडक्टवर पोलिसांचा छापा: पनीरमध्ये भेसळीचा संशय, नमुने तपासणीसाठी पाठवले



बीड,:बीड शहरातील पिंपरीगव्हाणे रोडवर असलेल्या दिया मिल्क प्रॉडक्ट या डेअरीवर बीड ग्रामीण पोलिसांनी काल, गुरुवारी छापा टाकला. पनीरसह इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.

छाप्यादरम्यान, पोलिसांना डेअरीमध्ये कास्टिंग सोडा आढळून आला, ज्यामुळे भेसळीच्या संशयाला बळ मिळाले आहे. डेअरीमध्ये बिहारी कामगार कामावर असल्याचेही दिसून आले. पोलिसांनी तात्काळ मलाई पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. हे नमुने केवळ अन्न प्रशासनाच्या अहवालावर अवलंबून न राहता, बाहेर राज्यातील प्रयोगशाळेतही तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नमुन्यांच्या प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. जिल्ह्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने, या कारवाईमुळे अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दिया मिल्क प्रॉडक्टच्या गोडाऊनवरही पोलिसांनी तपासणी केली आहे.

अन्न प्रशासनामार्फतही या नमुन्यांची तपासणी केली जाईल आणि अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!