बीड (प्रतिनिधी) – मस्याजोग येथील सरपंचांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण लिखाण करून जाती-जातीत द्वेष पसरवणे, तेढ निर्माण करणे, भडकाऊ मजकूर प्रसारित करणे, एका संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणारे लिखाण करणे, तसेच पोलिस अधिकाऱ्यांची नावे, जाती लिहून त्यांच्यावर तथ्यहीन आरोप करणाऱ्या शेकडो पोस्ट फेसबुक आणि एक्स या सोशल मीडियावर करून जाती-जातीत विष पेरण्याचे काम करणाऱ्या भैय्या पाटील नामक व्यक्तीविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भैय्या पाटील याने बीड जिल्ह्यात घडणाऱ्या विविध घटनांचा आधार घेऊन एका संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणारे द्वेषपूर्ण लिखाण केले आहे आणि आजही ते सुरू आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत यांनी जातीविषयक पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भैय्या पाटीलविरुद्ध सात एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. अखेर तपासाअंती पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (A) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उस्मान शेख करत आहेत.
—
### अजित पवारांच्या कार्यालयातून हकालपट्टी!
भैय्या पाटील हा पूर्वी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होता; मात्र त्याच्या सततच्या जातीयवादी भूमिकेमुळे दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातून भैय्या पाटील याची हकालपट्टी केली असल्याची माहिती आहे. तो सध्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया विभागाचा प्रमुख पदाधिकारी आहे.
—
कठोर कारवाईची अपेक्षा
जातीयवादी मानसिकतेतून जाती-जातीत विष पेरणारे, भावना भडकवण्यासाठी प्रक्षोभ निर्माण करणाऱ्या भैय्या पाटीलसारख्या विखारी वृत्तीविरोधात बीड पोलिस पुढे काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या व्यक्तीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
—
या विकृती ठेचणे आवश्यक
बीड जिल्ह्यात कोणत्याही घटनेला जातीय रंग देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विकृती फोफावल्या आहेत. यामुळे सामाजिक दरी वाढत आहे. भैय्या पाटील नामक इसमावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अशा विकृतींविरोधात पहिले पाऊल टाकले आहे. आता अशा सर्वच प्रकरणात कठोर भूमिका घेत पोलिसांनी अशा विकृती ठेचणे आवश्यक आहे.