बीड दि.24 (प्रतिनिधी):
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण व स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आदित्य जीवने यांनी दिली.
जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये दिनांक 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तसेच प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापरावर बंदी करणे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करून वर्गीकरण केंद्रात साठवणे याविषयी जनजागृती केली जाणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेनुसार प्लास्टिक कचऱ्यापासून उपयोगी वस्तू तयार करण्याचे उपक्रमही राबवले जातील. गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण व स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ श्रमदान आयोजित करून करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जीवने यांनी केले आहे. यामध्ये श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, तसेच कचरा वर्गीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक 28 मे रोजी ‘मासिक पाळी व्यवस्थापन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा व अंगणवाड्यांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत माहिती देण्यात येईल. यासाठी आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट, महिला शिक्षिका, आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ती या विषयी जनजागृती करणार आहेत
या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी- कर्मचारी यांनी नियोजनपुर्वक करावे. प्रत्येक गावासाठी खतखडा भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्याचे संनियंत्रण कर्मचारी करत आहे. या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा व हे उपक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.