बीड दि.25 (प्रतिनिधी):
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारे व माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला बडतर्फ करण्यात आले. कासले प्रकरणाची झळ पोलीस निरीक्षक डी.बी. गात यांना बसली आहे.
बीड येथील सायबर पोलिस ठाण्याला कार्यरत असलेले डी. बी. गात यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. गात यांची बदली म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार घडला आहे. चांगल्या अधिकाऱ्याला निष्कारण त्रास झाल्याची चर्चा होत आहे.
या संदर्भात माहिती की, सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांच्या कारनाम्यामुळे पोलीस खाते हादरून गेले. कासले याने चक्क गुजरातमध्ये जाऊन मोठी रक्कम वसूल केली. जिल्ह्यातील अनेक लोकांकडूनही मोठ्या रखमा उकडल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर निष्कारण बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले. तसेच पोलीस खात्याच्या सेवाशर्ती, नियमावलीचा भंग करून पोलीस खात्याला काळीमा फासण्याचे दुष्कृत केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत का व यांच्या अहवालावरून संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी नुकतेच निलंबित केले आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक कासले यांच्या कृत्याची झळ बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी. गात यांना बसली. कनिष्ठ अधिकाऱ्याने केलेले दुष्कृत्य हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कसे झाले नाही? तसेच आपल्या अधिकाऱ्यावर नियंत्रण नसणे व कर्तव्यास कसूर केल्या प्रकरणी डी. बी. गात यांना दोषी धरून नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे.
गाथे चांगले अधिकारी असले तरी असले प्रकरणात विनाकारण त्यांना झळ पोचली आहे. दरम्यान सायबर सेलचा तात्पुरता कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांच्याकडे देण्यात आला आहे.