जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात राजस्थान आणि महाराष्ट्रातील पर्यटकांसह काही स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू असून, दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याचे समजते. या हल्ल्यामागे टीआरएफ (द रेसिस्टन्स फ्रंट) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.
घटनास्थळी सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पुढील तपास सुरू आहे.