खोक्याला अटक आणि बीड जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई



उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला बीड येथे हजर केले जाणार आहे. मात्र, खोक्याला आणण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीची कारवाई सुरु झाली आहे. पोलिसांनी महसूल विभागाला दिलेला प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे खोक्याला बीड जिल्ह्यातून हद्दपारीचा मोठा झटका बसला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि वादग्रस्त व्हिडिओ
सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असून त्याच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. बॅटने मारहाण करणे, वाहनांत नोटांची साठवणूक, तसेच भाषणादरम्यान पाय मोडण्याची धमकी यांसारख्या घटना समोर आल्या आहेत. त्याच्या घरातून वनविभागाच्या छाप्यात शिकारीचे साहित्य आणि गांजाही जप्त करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींमुळे खोक्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे धस यांनाही टिकेला सामोरे जावे लागले.

हद्दपारीला मान्यता
शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर या पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वीही खोक्याविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. त्यामुळे त्याच्या हद्दपारीसाठी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याला उत्तर प्रदेशातून आणल्यानंतर दोन दिवसांत न्यायालयात हजर करण्यात येईल, परंतु त्याआधीच बीड जिल्ह्यातून त्याची हद्दपारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

error: Content is protected !!