भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्या अनेक वादग्रस्त व्हिडिओंनी सध्या खळबळ उडवून दिली आहे. पैशांचे बंडल फेकणे, धमक्या देणे, आणि अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी खोक्या भोसलेने एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात तो पैशांचे बंडल फेकताना आणि धमक्या देताना दिसतो.
खोक्या भोसलेच्या सातबारा उताऱ्यावर काहीही नोंद नसतानाही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती कशी आली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाने त्याच्या घराची झडती घेतली असता शिकारीचे साहित्य, वाळलेले मांस, आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर 200 हरिण मारल्याचा आणि सावकारकीचा आरोप आहे.
खोक्या भोसलेवर फसवणूक, गुंडगिरी, आणि पक्षविरोधी काम केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे 2021 साली भाजप भटके-विमुक्त आघाडी, बीड जिल्हाध्यक्ष या पदावरून त्याला हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आमदार सुरेश धस यांनी त्याला आपला कार्यकर्ता असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.