सतीश भोसले हा भाजपचा (BJP) पदाधिकारी आहे. प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्या भाईने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता. खोक्या भाईच्या या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक-एक करुन बाहेर येत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरण आणि मोरांची शिकार करण्याची आवड होती. गावकऱ्यांच्या मते, त्याने आतापर्यंत २०० पेक्षा अधिक हरणे मारली आहेत. याशिवाय, डोंगरात वागूर लावून अनेक मोर पकडून त्यांना खाल्ले असल्याचेही सांगितले जाते.
आठ दिवसांपूर्वी, सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या शेतात हरणं पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त होऊन खोक्या भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली.
या हल्ल्यात दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले आणि त्यांचा जबड्याला फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलालाही पाय फ्रॅक्चर झाल्याने तो लंगडत चालतो आहे. त्याच्या अंगावर इतर जखमाही आहेत.
१९ फेब्रुवारी रोजी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, सतीश भोसलेचा ‘आका’ सुरेश धस यांच्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली आहे.
सतीश भोसले याच्याकडून दिलीप ढाकणे यांना मारहाण होतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर खोक्या भाईला अटक कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. बीड पोलिसांनी खोक्या भाईला अटक करण्यासाठी दोन पथकं स्थापन केली आहेत. सतीश भोसलेचे दोन प्रकारच्या मारहाणीचे व्हीडिओ आहेत. शिरुर पोलीस ठाण्यात सतीश भोसले याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्याला अटक झालेली नाही. मात्र, आम्ही त्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार केली आहेत, असे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले.
गावकऱ्यांनी पोलिसांना इशारा दिला आहे की, जर गुन्हा नोंदवला नाही तर आम्ही शिरुर बंद ठेवून आमरण उपोषण करू.