अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असं पार्थ पवारांनी पत्रात म्हटलं आहे.
पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे, असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं.
दरम्यान, विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपणे पराभूत झाले आहेतच. आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.