पुणे पोलिसांनी लाल चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका ट्रकमधून अंदाजे १० ते १२ कोटी रुपये किमतीचे लाल चंदन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह एकाला ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या तस्करीच्या म्होरक्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
बंगळूरहून जेएनपीटीमार्गे आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी
कर्नाटकातील बंगळूर येथून हा कंटेनर निघाला होता. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा कंटेनर थांबवून तपासणी केली. जेएनपीटी बंदरातून हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवले जाणार होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चंदनाचे वजन आणि बाजारभाव तपासणी सुरू
पुणे गुन्हे शाखेकडून जप्त केलेल्या चंदनाचे वजन केले जात आहे. त्यानंतरच चंदनाची नेमकी किंमत आणि इतर तपशील उघड होईल. पोलिसांनी पकडलेले चंदन आणि ट्रक पाहिल्यानंतर प्रसिद्ध ‘पुष्पा’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे चंदन लाल चंदन आहे की चंदनाचा कोणता प्रकार आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पुढील माहिती पत्रकार परिषदेत
या प्रकरणाची अधिक माहिती पोलीस उद्या पत्रकार परिषदेत देणार आहेत.