प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात (Uttar Pradesh MahaKumbh Mela 2025) संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री 1 वाजता (29 जानेवारी) रोजी संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.