मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येईल असा विश्वास व्यक्त केला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शालेय शिक्षण विभागाने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून आवश्यक बदल करण्यासंदर्भात सूचना दिल्या. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आणि त्या शाळा आदर्श बनवणे यासारख्या महत्त्वाच्या सूचना केल्या. राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील 100 दिवसांत जोर देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंब केला जाईल. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार केला जात आहे, पुढच्या टप्प्यात सीबीएसई पॅटर्नच्या चांगल्या बाबी शाळांमध्ये घेण्याचा विचार आहे. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल असे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले.
राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणे अनिवार्य असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणे सक्तीचे असल्याचेही त्यांनी म्हटले.