बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू, राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक



बीड (परळी): बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टिप्पर चालकाला अटक करण्यात आली आहे.

सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शेतातून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने रात्री 8:30 वाजताच्या सुमारास धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात क्षीरसागर यांची दुचाकी पूर्णपणे चेंदामेंदा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर टिप्पर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात हा अपघात आहे की घातपात याची तपासणी सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास चालू आहे.

या घटनेच्या अगोदर बीडच्या मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या दोन्ही घटनांनी बीडमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

error: Content is protected !!