बीड ४ जानेवारी: सीआयडीने बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कामगिरी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्याजवळ पकडण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आता या 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी राज्यभरातून जोर धरत आहे. चार आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. तथापि, प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोनजण फरार होते. काल रात्री उशिरा सीआयडीच्या पथकाने पुण्याजवळ सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईचे नेतृत्व एलसीबीचे महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता..
पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक लवकरच जारी केले जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधिर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली होती. डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले.