वडिलांची तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन निर्दयी मुलांनी आपल्या वयोवृद्ध जन्मदात्यास रस्त्यावर सोडून दिल्याची संतपाजनक घटना तेलंगणमधील सिद्दीपेट जिल्ह्यातील माधीरा गावात घडली आहे. या प्रकरणी या तिन्ही भावांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या वृद्ध पित्याची प्रकृती बिघडल्याने ते सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, त्यांच्या निर्दयी मुलांना हुजाराबाद तुरुंगात डांबण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोथू माल्या यांनी आपली मालमत्ता पोथू सुधाकर, पोथू जनार्दन व पोथू रविंदर या आपल्या तिन्ही मुलांच्या नावे करून दिल्यानंतर, त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना रस्त्यावर सोडले. एवढेच नाहीतर निर्दयीपणाचा कळस म्हणजे या मुलांनी आपल्या आईचे सोन्या-चांदीचे दागिणे देखील घेतले. तर, यातील एका मुलाने आईला तिच्या नावावर सहा एकर जमीन असल्याने आपल्या बरोबर राहू देण्यास परवानगी दिली.
पोलिसांनी व महसूल अधिकाऱ्यांनी समुपदेशन करूनही तिन्ही भावडांनी आपल्या वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. धक्कादायक म्हणजे, त्यांनी त्या ग्रामस्थांनाही धमकवले ज्यांनी त्यांच्या वडिलांना खाण्यास दिले. अखेर ग्रामस्थांनी त्या वृद्धास वृद्धाश्रमात दाखल केले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वृद्धाश्रमात या वृद्ध पित्याची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माधीरा गावच्या महसूल अधिकाऱ्याने या प्रकरणी कोहिडा पोलिसात लिखीत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तिन्ही मुलांनी ते निर्दयी असल्याचे दाखवून दिली आहे. ग्रामस्थ, पोलीस व महसूल अधिकाऱ्याने समुपदेशन केल्यानंतर व समजूत घातल्यानंतरही ते वडिलांचा सांभाळ करण्यास तयार झाले नाही. असे कोहिडा एसआय राज कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलतना सांगितले आहे.