मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आरोपींना अटक व्हावी, यासाठी जनतेतून आणि विरोधकांकडून पोलिसांवर दबाव आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि माननीय वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये तळ ठोकला आहे.
वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, वाल्मिक कराड यांना अटक करण्याची आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
वाल्मिक कराड यांना कोणत्या गुन्ह्यात अटक केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी आहेत, परंतु खूनप्रकरणात त्यांना अद्याप आरोपी करण्यात आलेले नाही. आमदार जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी खूनप्रकरणातही वाल्मिक कराड यांना गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे आणि उर्वरीत तीन फरार आरोपींना अटक कधी होणार, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.