संतोष देशमुख हत्या प्रकरण: देवेंद्र फडणवीसांचे CID ला महत्त्वपूर्ण आदेश
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज (दि.28) सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली आहे.
आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID ला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. बीड प्रकरणात दोन मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बंदुकींसोबत ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगितले आहे.