माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार शनिवारी (28 डिसेंबर) होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे.
राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून देशाची अर्थव्यवस्था सुधारली. त्यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून भारतीय उद्योगांच्या पायातील बेड्या तोडल्या. पुढे ते सलग दहा वर्ष पंतप्रधान राहिले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल. भारतीयांमध्ये ‘ये दिल मांगे मोअर..’ ही वृत्ती भिनवणारे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच होते. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.
अशा शब्दात राज ठाकरे यांनी डॉ. मनमोहन सिंगयांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे