बीड जिल्ह्यातील पात्रुड गल्ली भागात अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून शेकडो लिटर रसायन नष्ट केले आहे. पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने आज पहाटे ही कारवाई केली.
कारवाईचा तपशील
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पात्रुड गल्ली भागातील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. पहिल्या ठिकाणी सहा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये शंभर लिटरचे रसायन आणि दोन पत्र्याच्या डब्यामध्ये १८ लिटरचे रसायन नष्ट करण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी पाच लिटरचे दोन ड्रम आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले. या दोन्ही कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस हवालदार आजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील सपोनि राठोड, सहाय्यक फौजदार सिरसाट, पोहे तांबारे, पोशि सय्यद, मनोज परजणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पात्रुड गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.