लॉकडाऊन काळात कसलेही पास गळ्यात टांगून फिरणाराला चोप द्या
– पोलिसांनो जुगाऱ्याचं पाणी पिऊ नका – अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्ह्यातील पाच शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या या आदेशाचं आता कडक पालन व्हावं. कसलेही पास अथवा ओळखपत्र गळ्यात टांगून फिरणाऱ्या लोकांना आता रोखलं पाहिजे. संचारबंदी काळात सेवेत असणाऱ्या पोलीस अथवा अन्य कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही नाश्ता, चहा पाण्यावर विसंबून राहू नये. मागच्या टप्प्यात संचारबंदी मध्ये जुगारी आणि काळ्या धंद्यावाल्याणी चहा पाण्याचे उद्योग करून पोलिसांची घसट वाढविल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. त्यामुळे या वेळी हे सगळं थांबवा. कोणालाही रस्त्यावर फिरू देऊ नका, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
मागच्या संचारबंदी काळात वेगवेगळे ओळखपत्र गळ्यात टांगून फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती. कर्मचाऱ्याने सेवेत असताना एक पाण्याची बाटली आणि आवश्यक असेल तर नाष्टा बरोबर ठेवला तर कसलीच अडचण येत नाही. मात्र जर असल्या किरकोळ अपेक्षा /वस्तू फुकटच्या मिळाव्यात म्हणून ठेवल्या तर नाहक लोक रस्त्यावर येतात. आणि त्यात नको ते लोक रस्स्यावर येतात. पर्यायाने त्यांना काळ्या धंद्यात लक्ष घालता येते.
कर्मचाऱ्यांना फुकटात नाष्टा, ज्युस, लस्सी, जेवण आणि चहापाणी पुरविणे याला “अत्यावश्यक सेवा” म्हणता येत नाही. त्यामुळे उलट प्रशासन बदनाम होत असते. शिवाय कर्तव्यात असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. कोविड -१९ साठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. त्यामुळे असले फालतू लागेबांधे या वेळी तोडावेत.
जनतेने आता कोरोना मुक्त होण्यासाठी तयार रहावे. आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. त्यामुळे त्यात जनतेने खरेदी करून ठेवावी. प्रत्येक नागरिकाने या लढ्यात स्वतःहून बंधने पाळली पाहिजेत. सकाळ, संध्याकाळ फिरणारांनी देखील आता बंधने पाळावीत. कोणाचाही कोणाशीही संपर्क येऊ दिला नाही, तरच ही साखळी आता तुटेल. अन्यथा कोरोना बळावत जाईल.
प्रशासनातील प्रत्येकाने बंधने पाळली पाहिजेत. आपल्यामुळे कोणी रस्त्यावर येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनतेने नियमांचे उल्लंघन करू नये. आताचे लॉकडाऊन / संचारबंदी कोरोनाला पळवून लावण्यासाठी संधी आहे. त्यामुळे नियमाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.