बीड मधील समस्यांच्या संदर्भात आ. संदीप क्षीरसागर अधिवेशनात आक्रमक

नागपूर (प्रतिनिधी): बीड शहर मधील महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली.

बीड शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न, खांडेपारगाव येथील टुकूर साठवण तलावाचा प्रलंबित मुद्दा आणि बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल बांधणी या महत्त्वाच्या विषयांचा आ. संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात मुद्देसूदपणे उल्लेख केला. बीड शहराची लोकसंख्या ३ लाख असूनही, पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा अनेक वर्षांपासून अपुरी असल्याने शहरवासीयांना नियमित पाणी मिळत नाही. अटल अमृत योजना पूर्ण झाली असतानाही, महावितरण कंपनीकडून ३६ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे नवीन कनेक्शन मिळत नाही, परिणामी शहराला १५ ते २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. शासनाने नगरपालिकेची थकीत वीजबिल भरण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली.

बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अनियमित असून दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपातळी खालावते. मुबलक पाऊस पडल्यानंतरदेखील पाण्याचा उपयोग होत नाही, कारण पाणी अडविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. बिंदुसरा नदीवर पूल कम बंधारा बांधल्यानंतर पाणी साठवणुकीची सुविधा होईल, असा क्षीरसागर यांनी दावा केला. हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

टुकूर साठवण तलाव प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध झाल्याने प्रकल्प रखडला आहे. याला पर्याय म्हणून नदीवर ४ निम्न पातळी बंधारे बांधले तर तितक्याच क्षमतेची पाणी साठवणूक होऊ शकते आणि अर्ध्या निधीतच हे काम होईल, त्यामुळे शासनाचे पैसे वाचतील, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

आ. संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवला असून, त्यांच्या मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास बीड जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि साठवणुकीच्या समस्या लवकरच सुटतील अशी आशा आहे.

error: Content is protected !!