बीड, दि. 11: केज तालुक्यातील मस्साजोग गावातील माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पवनचक्कीच्या वादातून 9 डिसेंबर रोजी हा खून झाला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रतिक भीमराव घुले (वय 25, रा. टाकळी, ता. केज) असे आहे. या प्रकरणात यापूर्वीच जयराम माणिक चाटे (वय 21, रा. तांबवा, ता. केज) आणि महेश सखाराम केदार (वय 21, रा. मैंदवाडी, ता. धारूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
प्रतिक हा खून घडल्यानंतर पुण्याकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुण्याकडे रवाना झाले आणि त्यांनी प्रतिकला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय झोनवाल, भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके, तुषार गायकवाड आणि चालक मराडे यांच्या पथकाने केली.
अटक केलेल्या प्रतिक घुलेला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक करून महत्त्वाची प्रगती केली आहे.