अंबाजोगाईत गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर पोलीस धाड, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड, दि. 3: अंबाजोगाई शहरात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत दहा लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या मते, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांना गणेश प्रोव्हिजन या दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्याची माहिती मिळाली होती. यानंतर पथकाने या दुकानावर छापा टाकला. छाप्यात रजनीगंधा, आरएमडी, विमल, गोवा, बाबा या कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गणेश बिडवे आणि किरण रविंद्र शेटे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहायक निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांनी केली.

      error: Content is protected !!