महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. तर महायुतीने 288 पैकी 230 जागांवर मजल मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. निकालाच्या दोन दिवसआधी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी हालचाली आखत होती. पण महाविकास आघाडीला या निवडणुकीत अवघ्या 50 जागांपर्यंत देखील पोहोचता आलेलं नाही. महाविकास आघाडीला या निवडणुकीत केवळ 46 जागांवर यश आलं आहे. या निकालावर विरोधकांकडून महायुतीवर घणाघात केला जात होता. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या सर्व गदारोळादरम्यान आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
काँग्रेसमधील पराभूत उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले आहेत. या पराभूत आमदारांनी आपल्या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे नागपूर मध्य मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तर उघडपणे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे नागपूर मध्य मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांनी अतिशय गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत, अशी टीका बंटी शेळके यांनी केली. माझा पराभव माझ्याच काँग्रेसने केला, असं बंटी शेळके यांनी म्हटलं आहे. मला तिकीट दिलं पण संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत नव्हते, असंदेखील बंटी शेळके म्हणाले. “नाना पटोले हे शंभर टक्के आरएसएसचं काम करतात. मी टिळक भवनच्या समोर या गोष्टी बोलून आलो आहे. कारण आमच्या नेत्या प्रियंका गांधी या आल्यानंतरही तिथे काँग्रेसचा कोणताही नेता तिथे उपस्थित नसेल तर इथली जबाबदारी कुणी घेतली पाहिजे? ही जबाबदारी कुणाची आहे?”, असा सवाल बंटी शेळके यांनी केला.