अमरावती : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांना यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. अचलपूर मतदारसंघातून गेल्या 4 टर्म ते येथील मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले असून दिव्यांगांसाठी व रुग्णसेवेसाठी त्यांनी मोठं काम उभारलंय. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने अमरावती जिल्ह्यातील राणा आणि कडू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. राणा दाम्पत्याने बच्चू कडूंना पाडण्यासाठी काम केल्यानेच कडू यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, माझ्या पराभवाचं कुणीही श्रेय घेऊ नये, असे म्हणत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राणा दाम्पत्यावर हल्ला केला. तसेच, मुस्लिमांचा फतवा आणि कटेंगे तो बटेंगेमुळे आमचा सेवेचा झेंडा हरल्याची प्रतिक्रिया कडू यांनी दिली. तसेच, माझ्या पराभवानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता, त्यांनी विचारपूस केली, असेही कडू यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला खूप कॉल आले, त्यामुळे आम्ही जनतेकडून अभिप्राय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. गेल्या 20 वर्षात लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत, कामात आम्ही महाराष्ट्रात अव्वल आहोत. पण, मुस्लिमांचा फतवा आणि कंटेंगे तो बटेंगे, यामुळे आमचा सेवेचा झेंडा हरला आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच, एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला, आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असेही कडू यांनी सांगितले. माझा पराभव त्यांनी करावा, एवढी राणा दाम्पत्यांची इतकी औकाद नाही. EVM च्या जागी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि आजमावून घ्या. खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, आत्ताच सांगावं रवी राणाने पाच वर्षे कशासाठी थांबता, अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टार्गेट करत चॅलेंज दिलंय.