जरांगे फॅक्टर चालला नाही

बीड, दि. २३ (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, “रपारप पाडा,” परंतु जनतेने जोरदार महायुतीचे उमेदवार निवडून आणले. जरांगेंचा रोष भाजपवर होता, पण झाले उलटचं. आजपर्यंत महाराष्ट्रात भाजपला कधीच मिळाले नाही एवढे यश मिळाले. भाजप प्रणित महायुतीला २३६ जागा मिळाल्या, तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीला ४८ जागा मिळाल्या. आघाडीचं पानिपत झालं, जरांगेंच्या इशाऱ्याचा अर्थ जनतेने वेगळाच घेतला, असेच म्हणावे लागेल.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करुन मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर जोरात चालेल असे बोलले जात होते. मराठवाड्यातील सगळ्या जागा मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याच निवडून येतील असे बोलले जात होते. मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते अनेकदा म्हणाले, “आम्ही सत्ताधाऱ्यांची जिरवू, ज्याने ज्याने त्रास दिला त्यांना रपारप पाडू, भाजपच्या तर सगळ्या उमेदवारांना पाडू.” परंतु झाले उलटेच. भाजपचे कधीच निवडून आले नाहीत एवढे उमेदवार निवडून आले. जवळपास ८५% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. शिंदेंचाही स्ट्राईक रेट चांगला राहिला, त्यांच्या ५० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर अजितदादांनीही ४० पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या.

या निवडणुकीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद राहिलं नाही. किमान २९ आमदार विरोधी पक्षनेते व्हायला लागतात, महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला २९ चा आकडा गाठता आला नाही. महाआघाडीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहिला. या तीनही पक्षांना मिळून पन्नाशीही पार करता आली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सलग आठ वेळेस निवडून आलेले आणि नवव्यांदा निवडणुकीस उभे असलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला. हे निकाल अनपेक्षित आहेत, असे उद्धव ठाकरेंनीही बोलून दाखविले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसची कधीच इतकी वाईट अवस्था झाली नव्हती.

निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती हे आता जनतेनेही दाखवून दिलं आहे,” असा टोला लगावला. मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात जरांगेंचा कुठेच प्रभाव दिसून आला नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बारामतीत अजितदादा पवार हे निवडून आले. युगेंद्र पवारांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

error: Content is protected !!