मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास मनाई करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.
२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. या निर्णयाला व्यवसायाने वकील उजाला यादव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना आखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. तसेही निवडणूक पार पाडणे हे जिकरीचे काम आहे.