: “खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले”, असं मिश्किल वक्तव्य भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी येथील महायुतीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. परळीचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, “खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं”.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश…? काय दत्ताभाऊ…? असे सांगत आपला पराभव कशामुळे झाला, त्याला कोण जबाबदार, असे काही प्रश्न उपस्थित करीत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे अन् मतदार यांच्याकडे पाहत त्या म्हणाल्या, “तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे,”
“पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे,” असे त्या म्हणाल्या
पाथर्डी येथील सभेत पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरु आहे. सभेला ऊसतोड कामगार आणि काही मुकादम उपस्थित होते. त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “ऊसतोड कामगारांचे मुकादम आलेत का?, की गेले कर्नाटकाला.. माझ्या हातात हे महामंडळ दिलं, तर तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरजचं लागणार नाही. पण तेच नाहीय ना…पण आता म्हणजे येवढं तर द्या…सभा तर करायला लावतात…महामंडळ तर द्या…पटकन दोन वर्षांत जिकडे-तिकडे करुन टाकते (सही)…”