माजी मंत्री जयदत्त अण्णांनी दिला पाठिंबा; योगेश क्षीरसागर यांना मिळाले बळ

बीड दि.12 (प्रतिनिधी):

        माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली असून बीड विधानसभा मतदारसंघात डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत आहोत. दोन दिवस सर्व राजकीय परिस्थिती कार्यकर्त्यांना बोलून समजून घेतली. त्यांच्या भावना समजून योग्य तो निर्णय घेतला आहे. आगामी काळात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जोमाने लढायच्या आहेत. तेव्हा सारे मनापासून कामाला लागा, असे आवाहन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून मंगळवारी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, विजयाताई क्षीरसागर (महिंद्रे), डॉ.सारिकाताई क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबीय आणि क्षीरसागर कुटुंबाचे हितचिंतक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मी आज परत एकदा सर्वांच्या समोर आलो आहे, दोन दिवस संपूर्ण राजकीय परिस्थिती आणि आपल्या एकूण भावनेचा विचार करून आणि पुढील राजकीय आयुष्याचा विचार करून एक चांगला निर्णय आपण घेत आहोत. आपण आयुष्यभर माझी साथ दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत आपण खंबीरपणे पाठीशी राहिलात, आपण विश्वासाने काम करत राहिलो, अर्ज मागे घेईपर्यंत हे गणित कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, मात्र एकूण सुरू असलेल्या सर्वच राजकीय चित्रावरून अर्ज मागे घेण्याचा आपण निर्णय घेतला. आपल्याला आपले ध्येय गाठायचे होते. उद्दिष्टे आपण ठरवलेली होती. परंतु नाईलाजाने आपण अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या या वाटचालीत अनेक चढ-उतार आपण बघितले आहेत. यश-अपयश पचवलेलेच आहे सध्याचे चित्र समोर आहे. गेल्या सहा महिन्यापासून आपण सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला, मात्र असे असतानाही जो निर्णय घेतला. तो घेत असताना माझ्याही मनाला खूप वेदना झाल्या. परंतु माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांची मने देखील महत्त्वाची होती. काही निर्णय, गोष्टी कार्यकर्त्यांच्या मतावरच ठरत असतात. आगामी काळात आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा अनेक राजकीय प्रवासातून जायचे आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आपण आजचा निर्णय घेत आहोत. सुरुवातीला बैठकीत आपण ज्या भावना व्यक्त केल्या, त्यानुसारच आपण पुढे जाणार आहोत, मी विश्वास देऊ इच्छितो, आगामी काळात माझ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, याची काळजी घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपण वेळ मागत होतो. तो क्षण आज उजाडला आहे. आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार व म्हणण्यानुसार सर्व गोष्टी आगामी काळात होतील. जे पूर्वी होते तेच आजही राहील आणि पुढेही राहील, काळजी करायची गरज नाही आणि निराश होण्याचीही गरज नाही, सगळं संपलंय अशी भावना निर्माण झाली होती. अनेकजण गैरसमज पसरवत होते की यांचे आता संपले, आपल्याला रान मोकळे झाले पण खोड अजून मजबूत आहे हे लक्षात ठेवा, पुन्हा नव्याने उभारण्याची हिंमत अजून खचलेली नाही. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा माझा खंदा कार्यकर्ता आहे, त्याला वाऱ्यावर सोडून मी जाईल का? स्व.काकूंच्या संस्कारात वाढलो आहोत, प्रत्येक जातीधर्मातील तळागाळातील माणूस आजही जोडलेला आहे, आज आपण सर्वांच्या हितासाठीच डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आपल्या विचारानुसार आणि मतानुसार तो सुद्धा योग्य तो सन्मान राखील याची शाश्वती देतो. भविष्यात होणारी वाटचाल ही आपल्या मतानुसारच चालेल, असे मत मांडले.

error: Content is protected !!