स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र जसजसं जग बदलतंय तसा नात्यातला ओलावा कमी होताना दिसत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लोक घरातील लोकांपासूनही दुरावले आहेत. आई-वडील देखील काही मुलांना जड झाल्याचं दिसतं. मात्र एकीककडे मॉडर्न समाजातील वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना बीडमधील मुलांनी आपल्या आईचं देऊळ बांधलं आहे.
एकीकडे अगदी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत माडर्नपणाच्या जगात “हम दो हमारे दो” ही कुटुंब पद्धतीमुळे वृद्धाश्रमात लक्षणीय वाढ झालीय. तर दुसरीकडे शेतकरी अन् ऊसतोड कामगार कुटुंब असणाऱ्या भावडांनी आपली दिवंगत आई सतत आपल्या समोर रहावी म्हणून थेट आईचं देऊळचं बांधलंय
आईच्या निधनानंतर ६ महिन्यात मंदिर
राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम असावी, असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य देऊळ बांधण्याचा निश्चय केला. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले.
10 बाय 13 च्या जागेत या मंदिराचे उभारणीचे काम सुरू झाले. 6 महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले. मूर्तीकाराचा शोध घेऊन त्यांनी पुण्यातील कातोरे या शिल्पकाराला मूर्ती बनवण्याचे काम दिले. कातोरे यांनी तब्बल 4 ते 5 महिने या मूर्तीवर काम करून अतिशय आकर्षक व बघताक्षणी सजीव वाटावी, अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली.
आम्ही आईचे देऊळचं बांधण्याचा निर्धार केला व आईच्या आशीर्वादानेच आमचा हा संकल्प आता पूर्ण झाला आहे. असं यावेळी राजेंद्र खाडेंसह भावडांनी सांगितलं.
तर याविषयी दिवंगत राधाबाई खाडे यांच्या मोठ्या सून सुमित्रा खाडे म्हणाल्या, की 40 वर्ष माझा आणि सासूचा सहवास आला. मात्र या 40 वर्षात आम्हाला त्यांनी आईसारखे सांभाळले. आज त्या आमच्यात नाहीत. मात्र त्यांचं मंदिर बांधलंय. त्यामुळं खूप चांगलं वाटतंय, असं सून असणाऱ्या सुमित्रा खाडे यांनी भावना व्यक्त केल्या. तर यावेळी नात असणाऱ्या लोचना वणवे, चांगुणा दहिफळे, भक्ती खाडे यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
तर यावेळी आपल्या मुलांनी पत्नीचं मंदिर बांधल्याने शंकर खाडे खुप चांगलं वाटत असून पत्नीची आठवण आली तर मी मंदिरात बसतो, असं सांगितलं. तर भाऊ कल्याण सानप यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
खाडे बंधूंनी बीड जिल्ह्यातचं नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, एका वेगळा आदर्श पण घेतला जात आहे. या खाडे भावंडांचा आदर्श आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या, नतदृष्ट मुलांनी घ्यावा आणि आपल्या आई वडिलांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमलावं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.