कोल्हापूर | राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. राजकीय पक्षांनी मतांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडणार नाही, असं महाविकास आघाडीतील नेते सांगत आहेत. त्यातच आता कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेसनेही नियोजन केलं आहे. आमदारांना मतदान आणि नियोजन याविषयी माहिती द्यायची आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये पक्षातील आमदारांनी मतदान केले. मात्र, ज्यांनी लपवून मतदान केले त्यांच्याकडून फटका बसला आहे, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली यासंदर्भात विचारले असता भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षातील ओबीसी नेते प्रचंड नाराज आहेत. भाजप आमदारांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिथे नेण्यात आले होते. पक्षात सारं काही अलबेल आहे असं भाजपाने समजू नये, असंही सतेज पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल,असं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आगामी काळात पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार?,याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.