पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करत आहेत’, राणे समर्थकाचा खळबळजनक आरोप

सोलापूर: माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर त्यांच्या संतप्त समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यानंतर तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार अडवल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर भाजपातील खदखद बाहेर पडत असताना पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपामधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील म्हणाले की, “केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असं मतही व्यक्त केलं आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्याचे सांगून पंकजा मुंडे पक्षाला नेहमीच ब्लॅकमेल करतात. वारसदार जन्माने नव्हे, तर कर्तृत्वाने ठरत असतो, याचा विचार पंकजा मुंडे यांनी केलेला दिसत नाही. शरद पवार, नितीन गडकरी यांच्यानंतर दिल्लीत शब्दाचे वजन असलेला देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांची नेहमीच पाठराखण करतात, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!