मुंबई: केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील करोनाचा मुख्य हॉटस्पॉट झालेल्या मुंबईत कोव्हिड रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शनिवारी मुंबई हे देशातील सर्वाधिक रुग्णवाढ झालेले ठिकाण ठरले. याचा अर्थ देशातील कोणत्याही राज्यापेक्षा एकट्या मुंबईत सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सातत्याने २० हजाराहून जास्त रुग्ण सापडत आहेत. साहजिकच यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबईकरांच्यादृष्टीने एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेत कमी आहेत. तसेच ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ येत आहे, त्यापैकी ९६ टक्के रुग्णांनी करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. उर्वरित ४ टक्के नागरिकांनी करोना लसीचा केवळ एकच डोस घेतला आहे. त्यामुळे करोना लस ही मुंबईकरांसाठी वरदान ठरताना दिसत आहे. करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये आजाराची तीव्रता तितकीशी नाही.
यापूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत जेव्हा दिवसाला ९७५३ रुग्ण सापडले होते, तेव्हा एका दिवसातील मृतांचा आकडा ८० इतका होता. मात्र, शनिवारी मुंबईत २० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडूनही मृतांची संख्या फक्त ६ इतकी आहे. त्यामुळे मुंबईतील करोना मृत्यूदर आवाक्यात असल्याचे दिसत आहे. याशिवाय, मुंबईत शनिवारी १३ दिवसानंतर रुग्णसंख्येत ३ टक्के घट दिसून आली. मुंबईत सध्याच्या घडीला ८० हजार सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, यापैकी केवळ १८ टक्के रुग्णच रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित नागरिक घरच्या घरी उपचार करुन बरे होत आहेत. ही परिस्थिती दिलादायक असली तरी मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने वाढत आहे. मुंबईत दर १०० चाचण्यांमागे २०.५८ लोकांना करोनाची लागण होत आहे.