‘आदित्य ठाकरेंचे हात कुठेतरी अडकलेत, ठाकरे कुटुंबाच्या बचावासाठी प्रयत्न’

रत्नागिरी: अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचे हात कुठे ना कुठेतरी अडकले आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून आदित्य ठाकरे यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला. ते रविवारी रत्नागिरी येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. हा दबाव मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच आणला जात आहे. कारण, शिवसेनेच्या दुसऱ्या कोणत्याही मंत्र्यांची पोलिसांवर दबाव आणण्याची लायकी नाही.

या सगळ्यात ठाकरे कुटुंबीय अडकल्यामुळेच शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांच्या बचावासाठी वक्तव्ये केली जात आहेत. तसेच पोलिसांवरही मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आहे. आदित्य ठाकरे यांचे हात याप्रकरणात कुठे ना कुठेतरी अडकलेत. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून CBI चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली होती. 

काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी सध्या सुशांत सिंह मृत्युप्रकरणावरून गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे म्हटले होते. यामध्ये व्यक्तिश: माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक केली जात आहे. ही एक प्रकार वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. पण मी अजूनही संयम बाळगला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच बॉलीवूडमधील लोकांशी जिव्हाळ्याशी संबंध असणे हा काही गुन्हा नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!