बीड | परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रीतम मुंडे यानी महाविकास आघाडी सरकार आणि अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्य सरकारने ओबीसी अरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल, असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यात आहे का?. तसेच केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या, भाजपमध्ये मध्ये खूप खमके माणसं आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालवू शकतात, असा टोला प्रीतम मुंडे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकार कोरोनातील कुठल्या ही प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार काहीच देत नाही, असं म्हणत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केले नाही, ते केले नाही. मग राज्य चालवायला माणूस मागून घ्या, असं त्या म्हणाल्या.
जोपर्यंत आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत पंकजा मुंडे ताईंच्या नेतृत्वात आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहोत. राज्य सरकार अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवून बहुजन समाजाची दिशाभूल करू पाहत आहे. बहुजन समाज भोळा आहे पण त्याला पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे हे या सरकारने विसरू नये, असं प्रीतम मुंडे म्हणाल्यात.