पुणे | मागील काही काळात बर्ड फ्लुचा फैलाव झाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना तसेच पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला होता. शहरी भागात कोंबड्यांच्या आणि अंड्यांच्या किंमती देखील कमी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या कोंंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन कमी झाल्याचं चित्र आहे. यावर पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं थेट फेसबुक लाईव्ह करत बारामती अॅग्रोवर गंभीर आरोप केले आहेत.(Serious allegation of farmers against Rohit Pawar’s Baramati Agro)
बारामती अॅग्रो कंपनीचं उत्पादन खराब झाल्यानं आणि कंपनीने विक्रीपुर्वी क्वालिटी चेक न केल्यानं पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असा आरोप योगेश चौरे या शेतकऱ्यानं केला आहे. तालुक्यात अनेक भागात पोल्ट्री व्यवसायिकांनी बारामती अॅग्रो कंपनीचं फीड खरेदी केलं होतं. मात्र हे फीड कोंबड्यांना दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना महिन्याला 3 लाखांचं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं आहे.
बारामती अॅग्रोच्या डाॅक्टरांनी येऊन कोंबड्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी कोंबड्यांचे नमुने घेतले पण त्यांनी त्याचा तपासणी अहवाल आम्हाला दिला नाही. 24 हजारांची औषधं दिली,पण त्याचा काही फायदा झाला नाही. गेल्या 2 महिन्यांपासून कोंबड्यांवर ट्रिटमेंट चालू आहे. बारामती अॅग्रोच्या फीडमुळे कोंबड्याच्या शरिरातील जाळी नष्ट झाली, त्या जाळीला पुन्हा तयार होण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागतो. पण बारामती अॅग्रोचे डाॅक्टर याबद्दल कोणताही अहवाल देत नाहीत किंवा याची जबाबदारी देखील घेत नाहीत, असं योगेश चौरे यांनी सांगितलं आहे.
डाॅक्टरांनी आरएनडी करायला सांगितलं. खराब वातावरण असल्यानं कोंबड्या अंडी देत नाहीत, असं क्षुल्लक कारण कंपनीचे डाॅक्टर देत आहेत, असाही आरोप या शेतकऱ्यानं केला आहे. कोंबड्यांना महिन्याला 80 हजारांचं खाद्य लागतं. गेली दोन महिने कोंबड्या अंडी देत नाहीत. त्यामुळे व्यासायिकांचं 3 लाखांचं नुकसान झालं आहे, असं योगेश चौरे म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार आणि कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. रोहित पवार गारपीट झाली तर शेतकऱ्यांच्या बांधावर जातात तर मग आमच्याकडे का येत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्याशी चर्चा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे.