Is the PM’s new home corona virus-proof?
मुंबईः ‘ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. दिल्लीत करोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. ही नवी घरे करोना विषाणुप्रूफ आहेत काय? याबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा,’ असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, मेहुल चोक्सी प्रकरणामुळं करोनाचा विसर पडेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
‘नव्या योजनेनुसार पंतप्रधान १५ एकरांच्या घरात जातील. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, अशी टीका सुरु झाली आहे. जॉन्सन यांनी लग्न केलं. आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? करोनामुळं देशातील ९७ टक्के जनता गरिबीच्या उंबरठ्यावर आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
‘मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ ही दिले जाईल,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.