नागरिकांचे आरोग्य धोक्यात
(27 May)- वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार परळी येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यातच आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीने शहरात धुमाकूळ घातला. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावर हा वेडा फिरत असल्याचे दिसून आले.
काल सायंकाळी धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क एका वेडसर व्यक्तीच्या हाती लागले. यानंतर हे पीपीई कीट घालून तो परळीच्या रस्त्यावर फिरताना दिसून आला.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता हा प्रकार धक्कादायक आहे. दुर्देवाने असाच एखादा व्यक्ती ‘सुपरस्प्रेडर’ बनुन धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.