कार्बन डायऑक्सिडमुळे रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने संबंधितांवर कारवाई करावी-अंनिस

कोविड सेंटरमध्ये विश्वशांती महायज्ञ, अंनिसची कारवाईची मागणी

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील ढाकळी ढोकेश्वर येथे माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती महायज्ञ करण्यात आला. मात्र हा प्रकार चुकीचा असून ती अंधश्रद्धा तर आहेच शिवाय कार्बन डायऑक्सिडमुळे रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी त्यांचे वडील माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तेथे २० मे रोजी विश्वशांती महायज्ञ करण्यात आला आला. यासंबंधी अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना पगार- गवांदे, सल्लागार बाबा अरगडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद भारुळे, काशिनाथ गुंजाळ, अॅड. प्राची गवांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, करोनामुक्तीसाठी महायज्ञ करण्यात आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. गेली वर्षभर आपण करोना विरोधात लढा देत आहेत. डॉक्टर व वैद्यकीय टीमच्या अथक प्रयत्नातून लाखो लोक करोनामुक्त झाले आहेत. अशा परिस्थितीत करोना मुक्तीसाठी महायज्ञ करणे म्हणजे त्या सर्वांचेच श्रेय नाकारणे, त्यांच्या प्रती अविश्वास व्यक्त करणारे आहे. तसेच अशास्त्रीय, अवैज्ञानिक व अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी कृती आहे. कोणत्याही पदार्थाचे ज्वलानानंतर त्यातून कार्बनडायऑक्साईड वायू तयार होतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. कोविड पेशंटला प्राणवायू कमी पडतो. त्यांना जास्तीत जास्त प्राणवायूयुक्त वातावरण व हवेची गरज असतांना कोविड सेंटरमधे महायज्ञ करून तेथील हवा दुषित करणे, कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढवून करोना रुग्णांच्या जीवनास धोका पोहचविणारी ही कृती आहे.

आम्ही प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा आदर करतो. परंतु त्या धार्मिक भावना जोपासणे, पालन करणे हे ज्याने त्याने आपल्या घरी अथवा खाजगी ठिकाणी करावे. कोविड सेंटरमधे अशा प्रकारची कृती करणे निषेधार्ह आहे. करोना रुग्णांच्या जीवाशी खेळणे आहेच परंतु लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांना चुकीच्या दिशेने नेणे आहे. त्यामुळे या महामारीच्या काळात लोकांच्या जीवनाशी खेळून अवैज्ञानिक मार्गाचा अवलंब करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारच्या अशास्त्रीय व अवैज्ञानिक गोष्टी यापुढे जिल्ह्यात घडणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!