बीड ( प्रतिनिधी ) बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यापारी, दूधवाले आणि अन्य व्यावसायिकांच्या टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी नियमाप्रमाणे आपापली तपासणी करून घ्यावी. जे दुकानदार अथवा व्यवसायिक तपासणी करणार नाहीत. त्यांची दुकाने बंद होणार आहेत, याची देखील नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे जे लोक मास्क वापरत नाहीत, अशां कडून कोणतीही खरेदी करून जनतेने स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून बीड शहरातील हजारो लोकांच्या टेस्ट विनामूल्य केल्या जात आहेत. याचा फायदा सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे जनतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या लोकांनी नियमाचे पालन करून आपल्या तपासण्या करून घ्याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे दिनांक आठ ते दहा या कालावधीमध्ये जे व्यवसायिक तपासणी करून घेणार नाहीत. त्यांची दुकाने बंद करण्याचे देखील आदेश आहेत. प्रशासनावर अशा प्रकारची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे अनेक व्यावसायिक विशेषतः रस्त्यावर विक्री करणारे फळ आणि भाजी विक्रेते त्याचप्रमाणे काही व्यावसायिक मास्क न वापरता आपले व्यवसाय करत आहेत. अशा लोकांनी मास्क वापरावेत. त्याच बरोबर जे लोक मास्क वापरत नाहीत, अशा लोकांकडून जनतेने कोणत्याही प्रकारची खरेदी करू नये.
कोरणा मुळे जनता त्रस्त असताना केले जाणारे उपचार हे मोफत असल्याने जनतेला या उपचाराची किंमत नाही का ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे. जनतेला कोणतीही गोष्ट मोफत मिळाली की, त्याची किंमत नसते. खिशातील दहा रुपये दिले तर त्या वस्तूचे महत्व वाढते. त्यामुळे मोफत उपचार कोरोणा वाढीसाठी कारणीभूत ठरतो आहे का ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे तिन दिवस सर्व प्रकारचे व्यवसाय बंद असताना अनेक ठिकाणी चौकामध्ये हातगाडीवर व्यवसाय चालू होते. नगर पालिका प्रशासनाची देखील अशा प्रकारचे धंदे रोखण्याची जबाबदारी आहे. मात्र बीड नगर पालिकेचे संबंधीत विभागाचे प्रशासन झोपी गेली आहे का ? असा प्रश्नही यावेळी जनता उपस्थित करत होती.
त्यामुळे नगरपालिकेने उद्या आणि परवा दोन दिवस जे कोणी व्यवसायिक रस्त्यावर धंदा करताना भेटतील त्यांना जास्तीत जास्त दंड करून योग्य ती कारवाई करावी. त्याचप्रमाणे मास्क न वापरणाऱ्या वर देखील कायद्याचा बडगा उगारून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.