जलयुक्त शिवार भ्रष्टाचार भोवला; कृषी सहसंचालकासह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

घटनेने उडाली खळबळ

बीड जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत 20 लाखांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह सहा अधिकाऱ्यांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने एकच खळबळ उडालीय. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मजूर संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून 20 लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यावर होता.

या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याच सिद्ध झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपसचिव एस एस धपाटे यांनी दिले होते. त्यानंतर याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली. त्यामध्ये 138 मजूर संस्था तसेच 29 गुत्तेदार आणि सुशिक्षित बेकार अभियंता 28 अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र मुख्य आरोपी रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी लक्ष वेधले होते. याबाबत उप लोक आयुक्त कार्यालयात ऑनलाइन सुनावनी देखील झाली होती. आज अखेर याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

error: Content is protected !!