संतापजनक प्रकार! एकाच वेळी रुग्णवाहिकेतून 22 मृतदेह स्मशानात घेऊन गेल्याचा प्रकार आला उघडकीस

प्रशासनाबाबत प्रचंड संताप अंबाजोगाई तालुक्यात उफळला

अंबाजोगाई – एकाच वेळी रुग्णवाहिकेतून 22 मृतदेह स्मशानात घेऊन गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच रुग्णवाहिकेतून पुन्हा रुग्णांची ने-आन केली जात असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली असून स्वारातीतील बेशिस्तपणाची घडी बसवण्याबाबत काल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपुर्ण बैठक होत स्वारातीला आणखी दोन अॅम्ब्युलन्स तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यापुढे अंत्यसंस्कार तात्काळ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून तशा सूचना उपविभागीय अधिकारी शरद झाळगे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

दोन दिवसांपुर्वी अंबाजोगाईच्या स्वारातीमधून एकाच वेळी रुग्णवाहिकेतून 22 मृतदेह स्मशानात घेऊन गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर याच रुग्णवाहिकेतून कोरोना संशयितांसह रुग्णांची ने आन केल्याचे उघड झाल्याने रुग्णालय प्रशासनाबाबत प्रचंड संताप अंबाजोगाई तालुक्यात उफळल्याचे दिसून येते. अंबाजोगाई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट असून तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण हे स्वारातीमध्ये उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे रुग्णालयात सर्वच गोष्टींचा तुटवडा जाणवतो. स्वारातीकडे सध्या दोनच रुग्णवाहिका असल्याने त्या तुलनेने कमी असून ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते त्याच रुग्णवाहिकेतून रुग्णांना ने-आन झाली असेल. सध्याची आपत्तीची परिस्थिती असल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. गेल्या वर्षी पाच रुग्णवाहिका होत्या, यावर्षी मात्र दोनच आहेत. असे डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितल्यानंतर आणखी दोन रुग्णवाहिका स्वारातीला घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. काल याबाबत स्वारातीत प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात बैठक झाली. यापुढे कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर तात्काळ अंत्यसंस्कार कर येणार आहे. दिवसभराचे मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्य करू नयेत, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाळगे यांनी सांगितले.

error: Content is protected !!