भंडारा : भंडारा गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी संचारबंदीच्या नियमांना केराची टोपी दाखवली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे नियम मोडत रात्री 11 वाजता सलून उघडायला लावले. त्यानंतर त्यांनी दाढी आणि हेअर कटींग केली. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील लूक्स सलून नावाचे एक सलून आहे. या सलूनचे शटर शुक्रवारी रात्री 11 नंतर उघडे दिसले. त्या सलूनच्या दुकानाबाहेर भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार आणि भंडारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची गाडी उभी होती. त्यांचा गार्डही दुकानाबाहेर उभा होता. त्यांनी संचारबंदीचा नियम तोडत रात्री अकरा वाजता सलून सुरु करायला लावले. त्यानंतर दाढी आणि हेअर कटिंग केली.
याच वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी व्हिडीओ काढला. काही नागरिकांनी रात्री अकरानंतर कुठल्या कायद्यात दुकान सुरू आहे, असा प्रश्न त्यांच्या गार्डला विचारला. त्यावेळी त्या गार्डने मला काही विचारु नका, साहेबांना विचारा, असे सांगत तोंड वळवले.
मात्र सुनील मेंढे यांना कोणीतरी आपला व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडीओ काढणे बंद असे लक्षात आल्यानंतर मेंढे यांनी दुकानाबाहेर येत गाडीत बसून पळ काढला.
या सर्व प्रकाराने चिडलेल्या संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सुनील मेंढे आणि दुकानदाराविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नगराध्यक्ष हा शहराचा प्रमुख व्यक्ती असतो. जर प्रमुख व्यक्ती अशा पद्धतीने मुद्दाम केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल, तर अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली जावी. तसेच नैतिकतेच्या आधारावर या नगराध्यक्ष आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.