भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये सुरेश रैना उपस्थित होता. सुरेश रैनासोबत बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.Mumbai Night Club Raid
सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे”.
मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.